सहा बाय आठ ची खोली.त्यात इन मिन तीन माणसं पाय दुमडून कसबस ऍडजस्ट होतात.चौथ्या माणसाला बाहेर कुठेतरी अंथरून घालावं लागतं, हक्काच घर म्हणून काकांच्या घरी कोडग्यासारखं वावराव आणि निपचिप दहा च्या आत पडून घ्यावं आपलं. हे रोजचचं.
ही सध्याची आर्थिक कौटुंबिक परिस्थिती मुंबईत आलेलो असतानाच्या पहिल्या दिवसांपेक्षा सुस्थितीत आहे असं म्हणावं लागेल.त्या दिवसासारखं
अंगावर आईची साडी पांघरून झोपावं लागत नाही. मसाले भाताची चव मात्र आईचा हाताला तेंव्हासारखीच आहे.बदललं एवढंच की आता तो रोज रोज बळच पोटात ढकलावा लागत नाही. पहाटे पाच वाजता उठून बंदरावर(डॉक) जाणारं माझं आईबाप दहा वाजता घरी आल्यावर त्यांच्या कपड्यांच्या येणाऱ्या मासळीच्या वासाची इतकी सवय झालीये की तो आता इंपोर्टेड परफीयूंम सारखा वाटतो...तो नाही आला की पॉकेटमनी मागण्याच धाडस व्हायचं नाही,पॉकेटमनी म्हणजे तरी काय ओ सातवीपर्यंत रुपया मिळायचा आणि मग आठवीला जंगी इन्क्रीमेंट झाली... चक्क रुपयाचे दोन रुपये झाले.आनंद गगनात मावेनासा होता.पण दोन रुपयांच्या कॉईनच्या रुपात तेव्हा तो मुठीत मात्र मावला होता.भाऊ सहा महिन्यांचा असतानापासूनच सकाळी पाच ते दहा म्हणजे पाच तास... सहा वर्षाच्या माझ्यावर त्याला सांभाळण्याची जबाबदारी.आई सकाळीच चहा बनवून एका थर्मास मध्ये ठेवायची.जेव्हा आम्ही उठू तेव्हा तो प्यायचा. त्यानंतर आईकडून चहा बनवायचं जे प्रशिक्षण घेतलं... आजही रोजचा सकाळचा चहा माझ्याच हातचा होतो.आई म्हणते तुझ्या हातचा चहा खुप मस्त लागतो.दगडू शांताराम परब सारख पॅपर पॅपर ओरडायची लाज वाटायची म्हणून लपत छपत दुकानावर जाऊन लाईन घायचो अन दिवस उगवायच्या आत पेपर टाकून घरी रिटर्न...घरच्यांना वाटायचं पोरगं गेलंय सकाळी सकाळी धावायला.तेव्हा एका महिन्याचे हजार रुपये मिळाले होते.माझी पहिली कमाई.शंभराच्या दहा नोटा दहादा मोजल्या असतील तेव्हा.
जबाबदारीचीच्या जाणिवेतून संवेदनशील मनाने मॅच्युरिटी नसलेल्या मेंदूला भावनांच्या संगमात बुडवून अतिसंवेदनशीलपणाचा धडा दिला आणि मी मोठा झालो याची जाणीव झाली. कॅफे काय असतं माहीत नाही.माझ्यासाठी ते गर्भश्रीमंतांच टाईमपास करण्याचं ठिकाण.मागे मामाने पुण्यात एका हॉटेलात नेलं होतं.तिथली चमक डोळे चमकाऊन गेली.एन्ट्री पासून exit पर्यंत मान वर काढलीच नाही.समोर वावरत असलेल्या इसमांच्या गळ्यातला लोंबनारा टाय..माझ्यासाठी 'फासी का फंदा' टाईप च काहीतरी वाटत होतं.कुणिकडं आलो राव इथं...नुसत वाटायचं.त्यानंतर पुणे फक्त ट्रेन मधूनच पाहतो.
हापापलेल्या जीवांना रस्त्यावर पाहून त्यांच्यासाठी काहीही न करू शकणाऱ्या मला तेव्हा मात्र माझं आयुष्य परमोच्च असल्यासारखं वाटतं. तेव्हा एवढंच पुटपुटतो मनात...
श्रीमंतीच्या टोपल्यात
उरलेली भाकर अर्धी,
उपासमारीचीच्या पायरीवरला
तेवढ्याच साठी दर्दी...
स्टोरीवर दिसणाऱ्या चंद्रकोर लावलेल्या हसऱ्या चेहऱ्यामागे
हळवं मन,स्ट्रगल,गरिबीची जाण या सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात वर असतो तो फक्त मुखवटा.
✍️बा.ल ऋषि
इंस्टा/@gavran_tadka_official